दारात उभ्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; संगमनेर तालुक्यात चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Rambhau
0

✍️ लोकवाणी आवाज 

 📝 १३ डिसेंबर २०२५

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक गडचिरोलीसह अनेक भागांत बिबट्या नागरी वस्तीत शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर नागपूरमध्ये दोन वेळा, तर रायगड आणि बीड जिल्ह्यांतही बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसर हादरून गेला आहे. चार वर्षीय सिद्धेश सूरज कडलग या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालून त्याचा जागीच मृत्यू केला.

जवळे कडलग गावातील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सूरज कडलग हे गोठ्यात जनावरांना चारा टाकत होते. याच वेळी आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्याकडे गेली होती. घराच्या दारात आजीची वाट पाहत उभा असलेला सिद्धेश याच क्षणी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या नजरेस पडला.

क्षणाचाही विलंब न करता बिबट्याने चिमुकल्यावर झडप घातली आणि त्याला ओढत नेले. या हल्ल्यात सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वडील आणि आजीने केलेल्या आक्रोशाने संपूर्ण परिसर सुन्न झाला.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानवी वस्तीत वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जवळे कडलगसह परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यापूर्वीही बिबट्याचे दर्शन आणि हल्ल्यांच्या घटना घडल्या असून नागरिकांनी प्रशासनाकडे सातत्याने बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र ठोस उपाय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

घटनेनंतर वन विभागाने संबंधित बिबट्याचा शोध सुरू केला आहे. परिसरात पिंजरे लावण्यात आले असून ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. २४ तास गस्त वाढवण्यात आली असली तरी नागरिकांमधील भीती काही केल्या कमी होताना दिसत नाही.

शेतात कामासाठी जायचे की नाही, मुलांना बाहेर सोडायचे की नाही, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. या भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने आणि हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन कठोर पावले उचलणार का, असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!