✍️ लोकवाणी आवाज
📝 १४ डिसेंबर २०२५
नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गामध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या जवळून हा मार्ग जात असल्याने सोलापूर–सांगली–चंदगड या टप्प्यात सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या महामार्गाचे प्रत्यक्ष काम २०२६ मध्ये सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाचा जुना आराखडा आता बदलण्यात आला आहे. याचवेळी मुंबई–कल्याण–लातूर–हैदराबाद या नव्या जनकल्याण दूतगती महामार्गाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली.
शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी ८०२ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी सुमारे ८६,५३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.
या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी १८ तासांवरून सुमारे ८ तासांपर्यंत कमी होणार आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासोबतच गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यांनाही या दळणवळणाचा अप्रत्यक्ष मोठा फायदा होणार आहे.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार असल्याने या भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे. उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा असून गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण आर्थिक हालचालींनाही गती मिळणार आहे.
विरोधक व सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपली भूमिका ठामपणे मांडली. यावेळी त्यांनी हिंदी भाषेत खालील कविता वाचून दाखवली —
अब आगे बढ़ चुका हूँ मैं,
पीना था जितना ज़हर, पी चुका हूँ मैं…
अब पग नहीं रुकने वाले, बढ़ चुका हूँ मैं…
जितना पढ़ना था तुमको, पढ़ चुका हूँ मैं…
अब और आगे बढ़ चुका हूँ मैं!
या कवितेनंतर आमदार जयंत पाटील यांनी “म्हणजे दिल्लीत का?” असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “नागपूरहून समृद्धी महामार्गाने थेट मुंबईकडे” असे उत्तर देत सभागृहात हास्य उमटवले
राज्यातील दळणवळण अधिक मजबूत करण्यासाठी समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर ते गोंदिया (१६२ किमी) पर्यंत करण्यात येणार आहे. या मार्गासाठी १८,५३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, जमीन संपादन अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूरहून गोंदियाला सहा तासांत पोहोचणे शक्य होईल.
तसेच —
भंडारा–गडचिरोली महामार्गासाठी १२,९०३ कोटी रुपये
गडचिरोली कॉरिडॉरसाठी २,५०० कोटी रुपयांचा खर्च
नागपूर–चंद्रपूर महामार्गाचे कामही सुरू
यामुळे गडचिरोली जिल्हा दळणवळण, उद्योग आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे.
मुंबई–हैदराबाद अंतर होणार कमी
नव्या जनकल्याण दूतगती महामार्गामुळे मुंबई ते हैदराबाद अंतर ५३० किमीपर्यंत कमी होणार आहे. मुंबई ते लातूर प्रवास चार तासांत शक्य होईल. महाराष्ट्रातील या महामार्गाची लांबी ४५० किमी असून, त्यासाठी अंदाजे ३६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सिंचन, पाणी व रोजगाराबाबत घोषणा
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की —
विदर्भ–मराठवाड्यातील १३.८३ लाख हेक्टर सिंचन अनुशेष जवळपास भरून काढण्यात आला
कोकणातून वाहून जाणारे १०० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे नियोजन
गेल्या तीन वर्षांत १ लाख २० हजार सरकारी नोकऱ्या
पुढील दोन वर्षांतही तितक्याच नोकरभरतीचा निर्णय
तसेच १ जुलैपर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
“आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहोत. गडचिरोलीसारख्या भागांचा विकास हे आमचे प्राधान्य आहे. २०३५ च्या अमृतमहोत्सवी महाराष्ट्रासाठी वेगाने काम सुरू आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

