✍️ लोकवाणी आवाज
🗓️ १५ डिसेंबर २०२६
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी ग्रामपंचायतीमध्ये सुमारे २५ लाख रुपयांच्या आर्थिक अपहाराचा गंभीर आरोप माजी ग्रामसेविका एन. एन. कुमरे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
या संदर्भात ८ ऑक्टोबर २०२५ रोजी १०३ ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन गट विकास अधिकारी धीरज पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यावेळी चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
ग्रामस्थांच्या मागण्यांमध्ये
माजी ग्रामसेविकेवर तत्काळ निलंबन व फौजदारी गुन्हा दाखल करणे,
१५ दिवसांत विशेष ऑडिट पूर्ण करून अहवाल ग्रामसभेसमोर मांडणे,
अपहाराची संपूर्ण रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात परत जमा करून घेणे
या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ग्रामसभेत दोन वेळा ठराव होऊनही संबंधितांनी हिशोब सादर केलेला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावाच्या विकासासाठीचा निधी गैरमार्गाने वापरला गेला असून, आम्ही हा लढा शांततापूर्ण पण ठामपणे लढणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाला महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने १६ डिसेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत लेखी आदेश काढून मागण्या मान्य केल्या नाहीत, तर उपोषण सुरू होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन ग्रामस्थांच्या उपोषणाची दखल घेते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

