✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २६ फेब्रुवारी २०२६
![]() |
| कोमातील महिलेला किरायाच्या गाडीतून बँकेसमोर आणताना कुटुंबीय – पोर्ला येथील घटना |
पोर्ला येथील Bank of Maharashtra शाखेविरोधात सध्या स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर या 25 फेब्रुवारी 2026 रोजी कोमात गेल्यामुळे त्या स्वतः बँकेत येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांची मुलगी व जावयाने त्यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढण्यासाठी पोर्ला शाखेत जाऊन विनंती केली.
मात्र “खातेधारक स्वतः हजर करा” असे सांगत शाखा व्यवस्थापकांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि उपस्थित लोकांनी केला आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे सांगूनही कोणताही मार्ग काढून देण्यात आला नाही. आजारी व्यक्ती कोमात आहे, हे सांगूनही कोणतीही सहानुभूती दाखवली गेली नाही, अशी खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली.
यापूर्वीही पोर्ला येथे नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता, ती बातमी वाचा – पोर्ला बस रोको आंदोलन; सुपर बस थांबा मागणी
शेवटी नाईलाजाने कुटुंबीयांनी किरायाची गाडी केली आणि कोमातील अवस्थेतच शांताबाईंना बँकेसमोर आणले. मात्र एवढ्या गंभीर परिस्थितीतही बँकेकडून एकही कर्मचारी गाडीपाशी जाऊन चौकशी करण्याची तसदी घेतली नाही, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. “अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवालही गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पोर्ला ग्रामसभेत शाखा व्यवस्थापकांच्या बदलीचा ठराव
दरम्यान, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत शाखा व्यवस्थापक कुळमेथे व उपशाखा व्यवस्थापक यांच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला. त्यांची तात्काळ बदली करावी व त्यांच्या कामकाजाची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामसभेतून करण्यात आली आहे.
गावातील तसेच परिसरातील अनेक खातेधारकांनी असभ्य वागणूक, योग्य माहिती न देणे आणि कामात टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अनेक वेळा नाराजी व्यक्त करूनही परिस्थितीत बदल झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींसाठी खालील बातमी वाचा – गडचिरोली-सिरोंचा NH-353C वनजमीन हस्तांतरणाला मंजुरी
आता या प्रकरणावर वरिष्ठ पातळीवरून नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावकऱ्यांची स्पष्ट मागणी आहे की, संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून योग्य ती चौकशी झाली पाहिजे. अन्यथा पुढील पावले उचलण्याचा इशारा देण्यात येत आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
काटली येथील शांताबाई मानकर या कोमात असल्यामुळे स्वतः बँकेत येऊ शकल्या नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढण्याची विनंती केली पण शाखा व्यवस्थापकांनी नकार दिल्याचा आरोप आहे.
महिलेला बँकेत कसे आणण्यात आले?
नाईलाजाने कुटुंबीयांनी किरायाची गाडी करून कोमातील अवस्थेत महिलेला बँकेसमोर आणले. मात्र कर्मचाऱ्यांनी गाडीपाशी जाऊन चौकशी न केल्याचा आरोप आहे.
ग्रामसभेत काय निर्णय झाला?
4 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत शाखा व्यवस्थापक व उपशाखा व्यवस्थापक यांच्या तात्काळ बदलीचा ठराव घेण्यात आल्याची माहिती आहे.

