✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १३ मार्च २०२६
![]() |
| कठानी नदीपुलाजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागलेली दृश्य |
गडचिरोलीकडे दवाखान्याच्या कामासाठी निघालेल्या एका युवकाच्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवार दि. 13 मार्च 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कठानी नदीपुलाजवळ घडली. सुदैवाने युवक, त्याची पत्नी आणि लहान मुलगी वेळीच खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली.
नगरी येथील प्रसिक खेवले हा युवक आपली दुचाकी क्रमांक एमएच 34–14 84 घेऊन पत्नी आणि लहान मुलीसह गडचिरोलीकडे दवाखान्याच्या कामासाठी येत होता. दरम्यान कठानी नदीपुलाजवळ पोहोचताच त्याला एक फोन आला. फोन रिसीव करण्यासाठी त्याने पुलाजवळ गाडी थांबवली.
हेही वाचा: आरमोरी येथे एसटी बस आणि ट्रॅव्हल्सची धडक; 20 प्रवासी जखमी, अपघातानंतर परिसरात एकच खळबळ
गाडी थांबवल्यानंतर काही क्षणांतच त्याच्या लक्षात आले की दुचाकीच्या इंजिनमधून धूर निघत आहे. पाहता पाहता इंजिनच्या भागातून आग पेट घेत असल्याचे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता पत्नी आणि मुलीसह गाडीपासून दूर जात आपला जीव वाचवला.
काही क्षणांत दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी
युवक व त्याचे कुटुंब गाडीतून दूर होताच काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आणि थोड्याच वेळात गाडी पूर्णपणे जळून राख झाली. गाडीत ठेवलेली सर्व कागदपत्रे देखील या आगीत जळून खाक झाली.
दरम्यान येणारे-जाणारे काही वाहनचालक आणि नागरिक घटनास्थळी थांबले, मात्र आगीचे स्वरूप इतके भयानक होते की कोणीही गाडी वाचवण्यासाठी पुढे येऊ शकले नाही. काही वेळातच दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
संबंधित बातमी वाचा: महाराष्ट्र राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2026: राज्यभर जनजागृती मोहीम, वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहन
लोकवाणी आवाज तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून अशा दिवसांमध्ये वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाहनाची वेळोवेळी तपासणी करावी, इंजिनमध्ये काही बिघाड जाणवला तर तात्काळ गाडी थांबवावी आणि सुरक्षित अंतर राखावे. तसेच वाहन सावधगिरीने व मर्यादित वेगात चालवावे.

