✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १४ मार्च २०२६
![]() |
| अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीटीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कापणी केलेले पीक सुरक्षित करण्यासाठी धडपड करताना (प्रातिनिधिक चित्र) |
राज्यात रब्बी हंगामातील पिकांची कापणी सुरू असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानातील अचानक बदलामुळे काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सध्या राज्यातील अनेक भागात गहू, हरभरा, ज्वारीसारख्या रब्बी पिकांची कापणी सुरू आहे. अशा वेळी अचानक पाऊस किंवा गारपीट झाल्यास शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. काही भागात गारपीटही होऊ शकते.
संबंधित बातमी: महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल; गायरान जमिनी सार्वजनिक प्रकल्पांसाठी वापरण्याचा निर्णय
पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात जास्त धोका
हवामान अंदाजानुसार 17 ते 20 मार्च या कालावधीत पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात दुपारनंतर वातावरण बदलण्याची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
विशेषतः खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा अधिक फटका बसू शकतो. हवामान खात्याच्या माहितीनुसार वादळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किमीपर्यंत जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: स्मार्ट प्रकल्पासाठी 103 कोटींचा निधी मंजूर; 2025-26 मध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार
दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना कापणी केलेले पीक मोकळ्या शेतात न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवून त्यावर ताडपत्री किंवा झाकण घालण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हवामान खात्याकडून 15 ते 16 मार्च दरम्यान सुधारित अंदाज जाहीर होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्या माहितीकडेही लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

