✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २० मार्च २०२६
![]() |
| पोर्ला तुलतुली प्रकल्प परिसरात विहिरीतून बाहेर काढलेला युवकाचा मृतदेह आणि घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ |
गडचिरोली तालुक्यातील पोर्ला गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 18 मार्च 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास पुंडलिक रमेश डहलकर हा युवक नैराश्यातून घरातून निघून गेला. काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असल्याची माहिती घरच्यांनी दिली.
रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, त्यामुळे वडील आणि नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. गावात, नातेवाईकांकडे आणि ओळखीच्या लोकांकडे चौकशी करण्यात आली. अनेक ठिकाणी फोन लावले, पण कुठेही काहीच माहिती मिळाली नाही. त्याने आधी आत्महत्येची भीती व्यक्त केली होती, त्यामुळे घरच्यांची चिंता वाढली होती.
रात्रीच गावातील विहिरी आणि आसपासच्या ठिकाणी शोध घेण्यात आला, पण त्या वेळी काहीच सापडलं नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध सुरू ठेवण्यात आला.
गरदेव टोलीजवळील तुलतुली प्रकल्पात मृतदेह सापडला
19 मार्च रोजी दुपारच्या सुमारास पोर्ला गावातील गरदेव टोली परिसरातील तुलतुली प्रकल्पातील जुन्या विहिरीत शोध घेतला असता, गळ टाकून पाहणी करण्यात आली. त्यावेळी युवकाचा मृतदेह गळाला अडकलेला दिसून आला. उपस्थितांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला तो निसटला.
यानंतर लगेच पोलीस पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या माध्यमातून पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

