✍️ रामकृष्ण बोरुले ( लोकवाणी आवाज )
🌐 ०७ जानेवारी २०२६
![]() |
| शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केलेले इयत्ता 4 थी व 7 वीचे विद्यार्थी शाळेसमोर कागदपत्रांसह |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षा सन 2026 मध्ये रविवार, 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहेत.
या संदर्भातील सविस्तर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली असून, ही माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नियम, अटी व वेळापत्रकाबाबतची माहिती www.mscepune.in तसेच https://puppssmsce.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनमान्य शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता चौथी व सातवीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी, अधिसूचनेतील अटी पूर्ण करत असल्यास या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासाठीचे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
शाळा माहिती प्रपत्र, विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र तसेच परीक्षा शुल्क 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. तसेच विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आणि अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
निर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी व शाळा प्रशासनाने दिलेल्या कालावधीतच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

