✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 ०८ जानेवारी २०२६
![]() |
| कोरची तालुक्यातील विकासकामांच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त करताना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा दर्शवणारे प्रतीकात्मक कार्टून चित्र. |
शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही कोरची तालुक्यातील विकास कामे रखडलेली असल्याने जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निधी असूनही कामे मार्गी लागत नसतील तर अशा निष्काळजी अधिकाऱ्यांविरोधात थेट निलंबनाची शिफारस शासनाकडे करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
कोरची तहसील कार्यालयात आयोजित विभागनिहाय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून प्रगती अहवाल मागवला. मात्र अनेक योजनांबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
या मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जाब
कर्मचारी वसाहतीचे अर्धवट राहिलेले बांधकाम
रबी हंगामातील कृषी क्षेत्र वाढ न होणे
विधवा व परितक्त्या महिलांना आर्थिक लाभ न मिळणे
धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात होणारा विलंब
सोहले येथील लोहखाणीतील कच्च्या मालाच्या चोरीचे प्रकरण
वारंवार बैठका, सूचना आणि आदेश देऊनही अंमलबजावणी होत नसेल तर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाचा निधी योग्य ठिकाणी खर्च न झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाईल, असेही पंडा म्हणाले.
बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरची येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेच्या इमारतीलगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे वर्गखोल्यांमध्ये दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी तात्काळ दुरुस्तीचे आदेश देत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.
नगरपंचायतीतील अनियमिततेबाबत निवेदन
कोरची नगरपंचायतीत सुरू असलेल्या बांधकामातील अनियमितता, भ्रष्टाचार व इतर समस्यांबाबत गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. या प्रकरणांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
महिला बचत गटांच्या कामाचे कौतुक
यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी महिला मंडळाद्वारे चालविण्यात येणाऱ्या माती रोटी हॉटेलला भेट दिली. महिलांनी स्वावलंबनासाठी उचललेल्या पावलांचे त्यांनी कौतुक केले. तसेच मोहफुलांपासून विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या संस्थांच्या कामाची पाहणी करून स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी मार्गदर्शन केले.

