गडचिरोलीतील चुरचुरा गाव 100% गॅसयुक्त; जयस्वाल-नरोटे यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टीम 

  🌐 २८ डिसेंबर २०२५


गडचिरोलीतील कार्यक्रमादरम्यान सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना स्थानिक प्रतिनिधी.
चुरचुरा येथील भेटीदरम्यान सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे स्थानिक पदाधिकार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गडचिरोली, दि. २८ – चुरचुरा गावाने धूरमुक्तीच्या दिशेने मोठी झेप घेत सर्व घरांना एलपीजी गॅस जोडणी उपलब्ध करून १०० टक्के गॅस सिलेंडरयुक्त गाव म्हणून स्थान मिळवले आहे. हा गाव विकासाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा मानस असल्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत-पुनर्वसन, विधी-न्याय, कामगार राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल साहेब यांनी सांगितले.

चुरचुरा येथे गॅस सिलेंडर वितरण व ग्रामपंचायत सभागृह विस्तारीकरण भूमिपूजन कार्यक्रमात ॲड. जयस्वाल बोलत होते. “राज्यात एकही घर चुलीच्या धुरात अडकून राहू नये. महिलांना सरपणासाठी जंगलात जाऊन धोका पत्करावा लागू नये. मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

पूर्वी चुरचुरातील ९२ कुटुंबांकडे गॅस जोडणी होती; उर्वरित ७२ कुटुंबांना आता दोन सिलेंडरसह सुविधा देण्यात आली. ग्रामस्थांनी उत्पादनकेंद्रित उपक्रमांकडे लक्ष केंद्रित केल्यास गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे मत ॲड. जयस्वाल यांनी व्यक्त केले.

संबंधित बातमी वाचा: गडचिरोली UATI गुंतवणूक प्रकल्प – औद्योगिक विकासाची नवी दिशा, स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती, शासनाची भूमिका, गुंतवणूकदारांचा सहभाग, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील परिणाम व डिसेंबर २०२५ संपूर्ण माहिती

आमदार डॉ. नरोटे साहेब म्हणाले की, वनव्यवस्थापन निधीतून ११ लाख रुपये देऊन गाव धूरमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले. पुढील टप्प्यात आर.ओ. पाणी सुविधा, स्ट्रीट लाईट व इतर विकासकामांसाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी जयस्वाल साहेबांनी इंजेवारी व देऊळगाव येथे भेट देऊन बिबट्या हल्ल्यात मृत झालेल्या कुदाताई मेश्राम व मुक्ताबाई नेवारे यांच्या कुटुंबियांना धीर देत शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

परतीच्या प्रवासात नागरिकाने वाघहल्ल्याची प्रलंबित तक्रार मांडली असता सहपालकमंत्र्यांनी तात्काळ थांबून वनविभागाला मदत प्रस्तावावर जलद कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

कार्यक्रमात जयस्वाल साहेब, आमदार नरोटे साहेब यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी संदीपजी ठाकूर, पुंडलिकजी येवले, सुरेंद्रसिंह चंदेल, छायाताई कुंभारे तसेच उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सरपंच खोब्रागडे, मनोज म्हशाखेत्री,  व अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!