✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 27 डिसेंबर 2025
गडचिरोली आता राज्याच्या शेवटी असलेला जिल्हा म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे उदयाला येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जिल्ह्यातील खनिज संपत्ती आणि येथील तरुणांची कौशल्ये लक्षात घेता सुमारे ३ लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून १ लाख रोजगार संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अडपल्ली येथे गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या सहयोगातून पीपीपी पद्धतीने स्थापन झालेल्या 'University Advanced Technology Institute (UATI)' च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाला कामगार राज्यमंत्री/सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर पोलीस महासंचालक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मराव आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मागील दशकात राज्य शासनाने आणि पोलिसांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे माओवादी प्रभाव कमी होत असून गडचिरोली विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होत आहे. “येथील तरुणांच्या हातात बंदूक नव्हे तर शिक्षण व रोजगाराची संधी असेल,” असे ते म्हणाले.
लॉयड्स मेटल्सने संस्थेसाठी 25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक व्यक्त केले. विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास व प्रवास सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा व प्रशिक्षण व्यवस्थासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
येथे मायनिंग, मेटलर्जी, संगणकशास्त्र, AI यांसह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम शिकवले जात असून 'लँग्वेज लॅब'मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसत असल्याचे उदाहरणही त्यांनी मांडले.
याच कार्यक्रमादरम्यान गडचिरोली पोलिसांच्या अंतर्गत सुरक्षा क्षमतेत वाढ करण्यासाठी 30 स्कॉर्पिओ, 2 बस व 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवत या वाहनांना रवाना केले.
तसेच पोलिस विभागाच्या वाढीव विश्रामगृहाचे भूमिपूजन व नंतर आयोजित ‘गडचिरोली महोत्सव’ सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांनी सहभाग नोंदवला.

