✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०७ फेब्रुवारी २०२६
![]() |
| गडचिरोलीतील नक्षलविरोधी मोहिमेचे प्रतिकात्मक दृश्य |
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती गडचिरोलीच्या दुर्गम जंगल भागात झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८) कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. गुप्त माहितीनुसार नक्षलवादी कंपनी क्रमांक १० चे सदस्य परिसरात सक्रिय असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये तीव्र चकमक झाली.
संघर्षादरम्यान एका महिलेसह पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते छत्तीसगड भागातून आले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळावरून एके-४७ आणि एसएलआर रायफलसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. चकमकीदरम्यान जखमी झालेल्या जवानांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.
३ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम सुरू करण्यात आली होती. ५ फेब्रुवारी रोजी सी-६० च्या चौदा कमांडो युनिट्सनी जंगल परिसराला वेढा दिल्यानंतर नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल झालेल्या संघर्षात दीपक मडावी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भामरागड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान ते हुतात्मा झाले. दुसरे जवान जोगा मडावी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे.
सीमेवरील कारवाई तीव्र; शासनाकडून मदतीची घोषणा
चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली असून सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांचे हालचाली रोखण्यात सुरक्षा दलांना यश आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमावर्ती जंगल पट्ट्यात सतत गस्त वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, सी-६० जवान दीपक मडावी यांच्या बलिदानाला शासनाने आदरांजली वाहत त्यांच्या कुटुंबासाठी २.२५ कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी जाहीर केली आहे. जवानांच्या शौर्यामुळे नक्षलविरोधी मोहिमेला बळ मिळत असल्याचे प्रशासनाने नमूद केले. पुढील काही दिवस शोधमोहीम सुरू राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

