✍️ लोकवाणी आवाज टीम
📅 ८ फेब्रुवारी २०२६
![]() |
| गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पोर्ला मंदिरात सकाळची पूजा-आरती आणि भक्तांची उपस्थिती |
पोर्ला येथील संत शिरोमणी श्री गजानन महाराज मंदिरात आज दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रगट दिन उत्साहात साजरा होत असून सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सप्ताहाच्या समारोप दिनामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे.
सकाळी ७.०० वाजता गजानन महाराजांची पूजा, अर्चना व आरती पार पडली. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यादरम्यान ग्रामस्थांनी भक्तिभावाने सहभाग घेतला.
दुपारी १२.०० वाजता ह.भ.प. ठाकरे महाराज देलोडा यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले असून धार्मिक संदेश व मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता बाल गोपाल गुरुदेव सेवा मंडळ, वसा यांच्या उपस्थितीत पारंपरिक गोपालकाला साजरा केला जाणार आहे.
आजच्या प्रगट दिनाचे कार्यक्रम व सप्ताहाचा आढावा
संपूर्ण सप्ताहादरम्यान घटस्थापना, दररोज सकाळची आरती, रात्री भजन संध्या, नामस्मरण व विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडले. शनिवारी हवनासह विविध भक्तीमय उपक्रम झाले. या सात दिवसांत गावात सातत्याने आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.
सायंकाळी ५.०० वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वसा, पोर्ला व आसपासच्या परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन महाराज सेवा मंडळ पोर्लाचे अध्यक्ष देवदासजी भोयर व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
समारोप दिनानिमित्त मंदिर परिसरात शिस्तबद्ध व भक्तिभावपूर्ण वातावरण राखण्यात येत असून आयोजकांनी भाविकांनी वेळेचे पालन करून कार्यक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती केली आहे. मोठ्या संख्येने भक्त सहभागी होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

