✍️ लोकवाणी आवाज टीम
📅 ०२ फेब्रुवारी २०२६
![]() |
| पोर्ला गावात श्री गजानन महाराज प्रगट दिन सप्ताहाच्या निमित्ताने शेगावहून आलेल्या दिव्य ज्योतीचे भक्तांच्या उपस्थितीत स्वागत करताना. |
पोरला गावातील संत शिरोमणी श्री गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक उत्सव दि. 02 फेब्रुवारी 2026 (सोमवार) ते दि. 08 फेब्रुवारी 2026 (रविवार) या कालावधीत साजरा केला जाणार आहे. या सप्ताहात घटस्थापना, दैनंदिन आरती, भजन संध्या, हवन, शोभायात्रा, प्रवचन, गोपालकाला आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
आयोजकांच्या माहितीनुसार दि. 01 फेब्रुवारी 2026 रोजी शेगाव येथून दिव्य ज्योतीचे पोर्ला येथे आगमन झाले. या दिव्य ज्योतीच्या स्वागतासाठी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळी काढून, सजावट करून व भक्तिगीतांच्या गजरात दिव्य ज्योतीचे स्वागत केले.
संबंधित बातमी वाचा: पोरला येथे प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रम
विशेष बाब म्हणजे दिव्य ज्योत आगमनानिमित्त सायंकाळी भजनाच्या गजरात फेरी काढण्यात आली. ही फेरी वसा/पोर्ला येथील साईबाबा मंदिर परिसरातून सुरू होऊन पोर्ला गावातील मुख्य मार्गाने पुढे निघाली. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. फेरीदरम्यान “गण गण गणात बोते”च्या जयघोषात वातावरण भक्तिरसाने भरून गेले. ही फेरी अखेर संत शिरोमणी श्री गजानन महाराज मंदिर परिसरात पोहोचली.
प्रगट दिन सप्ताहातील कार्यक्रम व वेळापत्रक
सोमवार दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.00 वाजता घटस्थापना होईल. त्यानंतर सप्ताहभर दररोज सकाळी 7.00 वाजता गजानन महाराजांची आरती व रात्री 8.00 वाजता भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. भक्तांसाठी कीर्तन-भजन, आराधना व नामस्मरणाचे कार्यक्रम ठेवण्यात आल्याने परिसरातील भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
कार्यक्रमानुसार शनिवार दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी आरतीनंतर दुपारी 2.00 वाजता हवन आयोजित करण्यात आले आहे. तसेच रविवार दि. 08 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.00 वाजता पूजा-अर्चना व आरती, सकाळी 8.00 वाजता शोभायात्रा व पालखी मिरवणूक, दुपारी 1.00 वाजता ह.भ.प. ठाकरे महाराज देलोडा यांचे प्रवचन आणि दुपारी 3.00 वाजता गोपालकाला होणार आहे.
यानंतर सायंकाळी 5.00 वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संत शिरोमणी श्री गजानन महाराज सेवा मंडळ पोर्ला व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने सर्व भक्तगणांनी कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रम पत्रिका कचऱ्यात न टाकता योग्य पद्धतीने जपून ठेवून नंतर विसर्जन करावे, अशी विनंतीही आयोजकांनी केली आहे.

