✍️ लोकवाणी आवाज
📝 ०५ डिसेंबर २०२५
मुंबई दि. ४ : राज्य शासनाने नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या आकृतीबंधात मोठा बदल करत ९६५ नवीन पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे. महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानंतर या विभागातील एकूण मंजूर पदांची संख्या ३,९५२ झाली आहे.
गेल्या काही वर्षांत दस्तनोंदणीचे व्यवहार वाढले, नवीन दुय्यम निबंधक कार्यालये उभारण्याची गरज निर्माण झाली आणि कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची मागणी होती. या परिस्थितीचा विचार करून आकृतीबंधात बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आवश्यक मार्गदर्शन दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार तयार केलेला सुधारित आराखडा ४ डिसेंबर २०२५ रोजी मंजूर झाला.
या नव्या मंजुरीत काय?
९६५ नवीन पदे निर्माण
यापूर्वी विभागात ३,०९४ पदे मंजूर
त्यापैकी १०७ पदे रद्द
एकूण नवी पदसंख्या: ३,९५२
नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी सांगितले की या निर्णयामुळे विभाग अधिक सक्षम आणि कार्यक्षम होणार आहे. पुरेसे कर्मचारी मिळाल्याने नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही वाढतील. तसेच दरवर्षी महसूल वाढवण्याच्या शासनाच्या उद्दिष्टपूर्तीलाही चालना मिळेल.
राज्यात महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये नोंदणी व मुद्रांक विभागाचा क्रमांक दुसरा आहे. या विभागासाठी आकृतीबंध बदलण्याची मागणी २०१६ पासून प्रलंबित होती. अखेर त्याला मंजुरी मिळाल्याने अनेक कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

