✍️ लोकवाणी आवाज
📝 ०३ डिसेंबर २०२५
मुंबई:- मुंबईत वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम तसेच नवी मुंबई विमानतळाकडे जाणारा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा आज शुभारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते टनेल बोरिंग मशीन (TBM) ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीन पटेल आणि एमएमआरडीएच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्व मुक्त मार्गामुळे पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत पोहोचणे सोपे झाले असले तरी पुढील प्रवासात 30 ते 45 मिनिटे वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतून नव्या विमानतळाकडे जाण्याकरिता परीघाचा लांब फेरा घ्यावा लागत होता. या तातडीच्या समस्येची दखल घेत हा बोगदा उभारण्याची संकल्पना मांडण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बोगदा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना वाहतुकीपासून मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यापूर्वी या ठिकाणी फ्लायओव्हर उभारण्याचा विचार झाला होता; मात्र जागेची प्रचंड कमतरता आणि दाट वाहतूक पाहता ते शक्य नव्हते. मोहम्मद अली रोड फ्लायओव्हरपेक्षाही अधिक दाट वस्ती या भागात असल्याने बोगदाच सर्वात सुरक्षित आणि व्यवहार्य पर्याय ठरला. हा बोगदा 700 पेक्षा अधिक प्रॉपर्टीजच्या खाली, शंभर वर्षांच्या हेरिटेज इमारतीखाली आणि दोन प्रमुख रेल्वे मार्गाखालून जाणार आहे. विशेष म्हणजे, हा बोगदा मेट्रो-3 च्या तब्बल 50 मीटर खालून खोदला जाणार आहे, जे पूर्ण प्रकल्पाला एक ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ बनवते.
या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, सहा महिने आधी काम संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. नामांकित एल अँड टी कंपनीकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील वर्षी वरळी–शिवडी सि-लिंक सुरू झाल्यावर आणि कोस्टल रोडची जोडणी झाल्यानंतर पश्चिम उपनगरात राहणाऱ्या नागरिकांनाही नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी सोयीची दोन मार्ग मिळतील. हजारो लोकांचे हजारो तास वाचणार असल्याने मुंबईच्या वाहतूक इतिहासात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. अटल सेतूमधून येणारी वाहतूक पूर्व मुक्त मार्गावरच अडकत असल्याने मोठी कोंडी निर्माण होत होती. नवीन बोगदा सुरू झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होईल. मरीन ड्राईव्ह, कोस्टल रोड आणि चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग मोठा दिलासा देणारा ठरेल. जसे मेट्रो-3, मेट्रो-2A, मेट्रो-7 यांसारख्या प्रकल्पांनी शहराचा चेहरामोहरा बदलला, त्याचप्रमाणे हा भूमिगत बोगदाही वाहतूक व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडवेल, असे ते म्हणाले.
या उपक्रमामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत, वायू व ध्वनी प्रदूषणात घट आणि रोजच्या प्रवासात १५ ते २० मिनिटांची बचत होणार आहे. पश्चिम उपनगर, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. भूमिगत वाहतुकीचा हा मोठा प्रयोग शहरातील पायाभूत सुविधांच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, असे त्यांनी सांगितले.
प्रकल्पाचे महत्त्वाचे तपशील
प्रकल्प खर्च : ₹ ८०५६ कोटी
पूर्णत्व कालावधी : ५४ महिने
एकूण लांबी : ९.९६ किमी (यातील ७ किमी भूमिगत भाग)
हा देशातील पहिला शहरी बोगदा असून, घनदाट लोकवस्तीखालून, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाखालून तसेच मेट्रो-३ च्या ५० मीटर खालून जाणारा दुर्मिळ प्रकारचा प्रकल्प आहे.
बोगद्यामध्ये:
दोन 3.2 मीटर रुंदीचे लेन
1 आपत्कालीन लेन
वेगमर्यादा 80 किमी/तास
प्रत्येक 300 मीटरवर क्रॉसपॅसेज
अत्याधुनिक वायुविजन व अग्निशमन व्यवस्था
आधुनिक ITS (Intelligent Transport System)
प्रकल्प शहरातली जागा न पाडता, जमिनीखाली मार्ग काढत असल्याने भू-संपादन अत्यल्प असून शहरातल्या दैनंदिन कामकाजाला अडथळा येणार नाही.
या कामासाठी उंच तंत्रज्ञानाची स्लरी शील्ड TBM यंत्रणा वापरली जाणार आहे. मुंबईच्या जटिल आणि खडकाळ भूगर्भ परिस्थितीला अनुकूल असल्याने हे तंत्रज्ञान सुरक्षित मानले जाते.
कटर हेड व्यास : 12.19 मीटर
लांबी : 82 मीटर
वजन : सुमारे 2400 मेट्रिक टन
प्रकल्पासाठी वापरले जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीची कामे स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक (ओईएम) यांचा देखरेखीत करण्यात आले आहे.

