✍️ लोकवाणी आवाज टीम
📅 ०३ जानेवारी २०२५
![]() |
| गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते व आरोग्य सुविधांअभावी गरोदर महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे दर्शविणारे प्रतीकात्मक चित्र. |
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा दोन निष्पाप जीवांचा बळी घेऊन समोर आला आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेवर रस्ता आणि आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
आलदंडी टोला या गावाला आजही पक्का रस्ता नाही. याच कारणामुळे नववर्षाच्या दिवशी आशा संतोष किरंगा या आपल्या पतीसोबत जंगलातील वाटेने तब्बल सहा किलोमीटर चालत पेठा येथे असलेल्या बहिणीच्या घरी निघाल्या होत्या. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. सलग पायपीट आणि थकव्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या.
संबंधित बातमी वाचा: वासा ॲम्ब्युलन्स सेवा उद्घाटन – गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना नवी दिशा, ग्रामीण भागातील रुग्णवाहिका उपलब्धता, स्थानिकांचा प्रतिसाद व डिसेंबर २०२५ संपूर्ण माहिती
तत्काळ रुग्णवाहिकेने त्यांना हेडरी येथील कालीअम्माल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला, मात्र उपचार सुरू होईपर्यंत उशीर झाला होता. पोटातील बाळाचा मृत्यू झाला आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशा किरंगा यांचाही मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेनंतरही प्रशासनाची असंवेदनशीलता कायम राहिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण देत मृतदेह पुन्हा 40 किलोमीटर अंतरावरील अहेरी येथे हलवण्यात आला. जिवंतपणी रस्त्याअभावी झालेली धावपळ मृत्यूनंतरही थांबली नाही, यामुळे संतप्त भावना अधिक तीव्र झाल्या आहेत.
या घटनेने दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे विदारक वास्तव समोर आणले आहे. रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे, तज्ज्ञ डॉक्टर आणि तत्काळ उपचार सुविधा नसल्यामुळे आजही गरोदर महिलांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून प्रशासनाने तातडीने रस्ते बांधणी, आरोग्य सुविधा बळकट करणे आणि दुर्गम भागात डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

