✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 ०१ जानेवारी २०२६
![]() |
| गडचिरोलीत सुरजागड लॉयड मेटल्स कंपनीविरोधात वनहक्क व अतिक्रमणाच्या मुद्द्यावर आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे बेमुदत ठिय्या आंदोलन |
गडचिरोली : सुरजागड लॉयड मेटल्स कंपनीकडून आदिवासी बहुल भागातील वनहक्क जमिनी व लाल पट्ट्यातील शेतीचा बेकायदेशीर वापर होत असल्याच्या आरोपावरून, आदर्श समाज विकास सेवा संस्था पोर्ला यांच्या पुढाकाराने 29 डिसेंबर 2025 पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय, गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलन स्थळी लावलेल्या बॅनरमधील माहिती व संस्थेकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार, कंपनीने वनविभागाच्या जमिनींवर उत्खनन, प्लांट, रस्ते तसेच बांधकामे करून मोठ्या प्रमाणात वनजंगलाचे नुकसान आणि झाडांची तोड केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुख्य आरोप पुढीलप्रमाणे
• बांडे, हेडरी, परसालगोंदी परिसरातील वनजमिनींचा अतिक्रमण करून प्लांट उभारणी व उत्खनन सुरू.
• सर्वे नं. 27 मध्ये बेकायदेशीर घरकुल (काटर्स) बांधल्याचा आरोप.
• नदी पात्रात दगड-माती टाकून मार्ग तयार केले असल्याचा उल्लेख.
• हजारों झाडांची तोड करून 15–20 फूटांचे रस्ते तयार केल्याचा दावा.
• वनविभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निष्क्रीय भूमिका घेतल्याचा आरोप.
• वनपट्टा मिळालेल्या आदिवासींंच्या शेतीजमिनीवर कंपनीकडून अतिक्रमण केल्याचा आरोप.
संस्थेच्या मागण्या
सुरजागड लॉयड मेटल्स कंपनीच्या कामांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी.
वनजमिनीवरील सर्व अतिक्रमण हटविण्यात यावे.
संबंधित वनअधिकारी व कर्मचारी सेवेतून निलंबित/कारवाई करावी.
संपूर्ण क्षेत्राची मोजणी व्हिडिओग्राफीच्या उपस्थितीत करण्यात यावी.
संस्थेचे अध्यक्ष योगाजी पांडुरंग कुडवे, उपाध्यक्ष नीलकंठ कवडूजी संदोकर, विलास भनारकर, रघुनाथ सिडाम, चंद्रशेखर सिडाम, रामकृष्ण बोरुले आणि आदिवासी बांधवांचे उपस्थितीत आंदोलन सुरू झाल्याची माहिती निवेदनात देण्यात आली.
टीप
आंदोलन सुरु असून प्रशासनाकडून प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

