✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ३१ मार्च २०२६
![]() |
| गडचिरोलीतील एकलव्य आश्रम शाळेतील १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना, प्रिन्स मेश्राम याचा फोटो |
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील शांतिनगर येथील १७ वर्षीय प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम या विद्यार्थ्याने एकलव्य आश्रम शाळेच्या वसतिगृहात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रिन्स मेश्राम हा अकरावीचा विद्यार्थी असून गडचिरोली शहराजवळील सेमाना मार्गावरील एकलव्य निवासी मॉडेल शाळेत शिक्षण घेत होता. तो शाळेच्या वसतिगृहात राहत होता. सोमवारी सायंकाळी सुमारे ६:२० वाजण्याच्या सुमारास तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोरलात बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ
घटनेच्या वेळी त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. प्रिन्स हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याची आई शिक्षिका असून या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शांतिनगरसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
हसऱ्या चेहऱ्यामागे दडले होते दुःख
सोमवारी शाळेत नव्या शैक्षणिक सत्रानिमित्त प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता. या कार्यक्रमात प्रिन्स मेश्रामने तबलावादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली होती. कार्यक्रमानंतर तो मित्रांसोबत जेवणही केला होता. मात्र अवघ्या काही वेळातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
प्रिन्स अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेत असताना शाळेच्या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका खोलीत तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे त्याची लहान बहीणही याच शाळेत शिक्षण घेत असून या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

