✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज )
🌐 २१ डिसेंबर २०२५
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने चांगले यश मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद दाखवली असताना, दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. येथे काँग्रेसने मुसंडी मारत विजय मिळवल्याने भाजपच्या पराभवाची चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली नाराजी चर्चेचा विषय ठरली. पक्षाकडून अपेक्षित बळ न मिळाल्याची भावना त्यांनी जाहीरपणे मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
चंद्रपूरमधील पराभवाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या नगरपालिकांमध्ये भाजपला यश मिळाले नाही, त्या ठिकाणी नेमक्या कोणत्या कारणांमुळे अपयश आले याचा सखोल अभ्यास केला जाईल. पक्षात कुठे कमतरता राहिली असेल, तर ती दुरुस्त करून आगामी निवडणुकांमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या ‘पक्षाला दारं नाहीत’ या वक्तव्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राजकीय पक्ष कुणासाठीही बंद नसावा. कोणत्याही समाजासाठी किंवा व्यक्तीसाठी पक्षाची दारं बंद असू नयेत. मात्र, प्रवेश देताना संबंधित व्यक्ती पक्षासाठी योग्य आहे का, पक्षाला फायद्याची आहे का, याचा विचार होणं गरजेचं आहे.
जर काही ठिकाणी प्रवेशामुळे पक्षाला फायदा झाला असेल, तर त्याचे परिणामही दिसून आले आहेत, कारण संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाने मोठा विजय मिळवला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सुधीर मुनगंटीवारांना कुठे ताकद कमी पडली असेल, तर त्याची भरपाई आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये केली जाईल. चंद्रपूर महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी पक्ष पूर्ण क्षमतेने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूरमधील निकालांवर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील काही निर्णयांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले होते. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने वडेट्टीवारांना राज्यातील प्रमुख नेते म्हणून पुढे आणले, मात्र चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना एकही मंत्रीपद मिळाले नाही. स्वतःला मंत्रीपद न मिळाल्याची खंत नसली तरी, या संपूर्ण विभागाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच, बाहेरच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर पक्षात प्रवेश दिल्याचा परिणाम मतदारांवर होत असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले होते.
काँग्रेसला मिळालेल्या यशावर बोलताना मुनगंटीवार यांनी संयमित भूमिका घेतली. विजय मिळाला तर गर्व करू नये आणि पराभव झाला तर लाजू नये, असे सांगत त्यांनी मतदारांचा कौल स्वीकारण्याची भूमिका मांडली. जर काँग्रेसचे प्रतिनिधी विकासकामे अधिक प्रभावीपणे करत असतील आणि जनतेचे प्रश्न सुटत असतील, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे ते म्हणाले.
घरकुल, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आणि इतर मूलभूत प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून सुटणार असतील, तर जनतेच्या हितासाठी भाजप त्याच्या आड येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

