✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज )
🌐 २१ डिसेंबर २०२५
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील स्थानिक राजकारणाचं स्पष्ट चित्र समोर आलं आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जाहीर झालेल्या या निकालांमध्ये महायुतीने राज्यभरात ठोस आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होईल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बहुतांश ठिकाणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातच प्रमुख लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचा परिणाम अंतिम निकालांमध्ये स्पष्टपणे उमटलेला आहे.
अंतिम आकडेवारीनुसार राज्यभरात महायुतीने एकूण 214,जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपने 120, शिवसेना (शिंदे गट) ने 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने 37 जागांवर यश संपादन केलं आहे. या निकालांमुळे भाजप हा या निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना (शिंदे गट) चा स्ट्राइक रेटही उल्लेखनीय राहिला आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा मर्यादित यश मिळालं आहे. महाविकास आघाडीला एकूण 50 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यामध्ये काँग्रेसने 30, शिवसेना (ठाकरे गट) ने 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने 10 जागा जिंकल्या आहेत. विविध भागांमध्ये स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांनीही 24 जागांवर विजय मिळवला आहे.
गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर पूर्ण झाल्या. पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींमध्ये मतदान पार पडलं होतं. त्यानंतर 2 आणि 20 डिसेंबर रोजी उर्वरित टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर हे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत.
दरम्यान, जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांवर या निकालांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असून, या निवडणुकांत कोणता पक्ष अधिक जागा जिंकतो यावर पुढील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची राजकीय समीकरणं ठरण्याची शक्यता आहे.

