✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज )
🌐 २१ डिसेंबर २०२५
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यभरातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बहुप्रतीक्षित निकाल आज जाहीर होत असून, एकूण 288 संस्थांचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, या निकालांकडे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांचा आरसा म्हणून पाहिले जात आहे. मतदारांनी कोणत्या पक्षावर विश्वास व्यक्त केला, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष अनेक ठिकाणी थेट एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. त्यामुळे ही लढत सत्ताधारी विरुद्ध विरोधक एवढीच मर्यादित न राहता, मित्रपक्षांमधील वर्चस्वाचीही परीक्षा ठरली.
विभागनिहाय निकालांची संख्या
राज्याच्या विविध विभागांमध्ये आज जाहीर होणाऱ्या निकालांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे –
पुणे विभाग: 60 संस्था
नाशिक विभाग: 49 संस्था
छत्रपती संभाजीनगर विभाग: 52 संस्था
अमरावती विभाग: 45 संस्था
नागपूर विभाग: 55 संस्था
कोकण विभाग: 27 संस्था
ही निवडणूक दोन टप्प्यांत घेण्यात आली होती, त्यापैकी दुसऱ्या टप्प्याचे निकाल आज जाहीर होत आहेत. राजकीय वर्तुळात या निकालांकडे आगामी महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. कारण लवकरच राज्यातील 29 महत्त्वाच्या महापालिकांसाठी मतदान होणार असून, आजचा कौल त्या निवडणुकांवर परिणाम करू शकतो.
यावेळी अनेक ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही ठिकाणी स्वपक्षीय उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निकालाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आता या राजकीय रणधुमाळीत कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि कोणत्या पक्षाचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

