✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज )
🌐 20 डिसेंबर 2025
आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांत करण्यात आलं असून, स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. घरच्या मैदानावर वर्ल्डकप होत असल्यामुळे भारताकडे विजेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून पाहिलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय निवड समितीने 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून, संघनिवडीत अनेक मोठे आणि अनपेक्षित बदल करण्यात आले आहेत. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या काही निर्णयांमुळे टीम इंडियाचं चित्र पूर्णपणे बदललं आहे. काही अनुभवी खेळाडूंना डावलण्यात आलं आहे, तर काही नव्या नावांना संधी देण्यात आली आहे.
इशान किशनची संघात पुनरागमन
दीर्घकाळ संघाबाहेर असलेल्या इशान किशनला अखेर टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे. गेल्या दोन वर्षांपासून संघात पुनरागमनासाठी प्रयत्न करणाऱ्या इशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. विशेषतः सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सर्वाधिक धावा करत त्याने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याचा वर्ल्डकप संघात समावेश करण्यात आला.
उपकर्णधारपदात बदल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टी20 संघाचं नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र त्याला या वर्ल्डकपसाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे उपकर्णधारपदात बदल करण्यात आला आहे. आता ही जबाबदारी अक्षर पटेलकडे देण्यात आली असून, तो संघातील महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
ऋषभ पंतचा पत्ता कट
मागील टी20 वर्ल्डकपमध्ये प्रभावी कामगिरी करणारा विकेटकीपर ऋषभ पंत यावेळी संघाबाहेर राहिला आहे. मागच्या स्पर्धेत त्याने संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला होता. तरीही सध्याच्या संघरचनेत त्याला स्थान देण्यात आलेलं नाही, हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे.
मोहम्मद सिराज वगळला
तीनही फॉरमॅटमध्ये नियमित खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही टी20 वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं आहे. तो मागील टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा भाग होता, मात्र यावेळी निवड समितीने वेगळा पर्याय निवडला आहे.
हार्षित राणाला संधी
मर्यादित कामगिरी असूनही हार्षित राणाला वर्ल्डकप संघात संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांत त्याने केवळ तीन विकेट घेतल्या होत्या, तर एका सामन्यात त्याला विकेटही मिळाली नव्हती. तरीही निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
टी20 वर्ल्डकपपूर्वी घेतलेल्या या निर्णयांमुळे भारतीय संघाची रचना आणि धोरण स्पष्टपणे बदललेली दिसत असून, ही निवड टीम इंडियाला कितपत यश मिळवून देईल, हे आता स्पर्धेदरम्यानच कळणार आहे.

