✍️ लोकवाणी आवाज
🌐 १९ डिसेंबर २०२५
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तुमरकोठी परिसरात उभारण्यात आलेल्या नव्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन आज अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे यांच्या हस्ते करण्यात आले. नक्षलप्रभावित व सीमावर्ती भागात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त मजबूत करण्याच्या दृष्टीने हे पोलिस ठाणे महत्त्वाचे मानले जात आहे.
या उद्घाटन समारंभास नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या १९१ बटालियनचे कमांडंट सत्यप्रकाश यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तुमरकोठी पोलिस ठाण्याची उभारणी गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० पथकातील सुमारे एक हजार कमांडो, बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या २१ तुकड्या, शेकडो नव्याने भरती झालेले पोलिस कर्मचारी, जवळपास ५०० पोलिस अधिकारी तसेच खासगी कंत्राटदारांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
हे पोलिस ठाणे कोठी पोलिस ठाण्यापासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर असून छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत अवघ्या २ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे.
उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या जनजागरण कार्यक्रमात परिसरातील महिला व पुरुषांना कपडे, शेतीसाठी लागणारे साहित्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि क्रीडा साहित्य देण्यात आले.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली पोलिस दलाने छत्तीसगड सीमेलगतच्या भागात एकूण ९ नव्या पोलिस ठाण्यांची स्थापना केली असून, नक्षलविरोधी मोहिमेला त्यामुळे मोठी मदत होत आहे.

