✍️ लोकवाणी आवाज
🌐 १९ डिसेंबर २०२५
![]() |
| स्रोत : संबंधित विभागाची अधिकृत वेबसाईट |
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून सन २०२३-२४ पासून “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” राबविण्यास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीमधून या योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या वर्षातील एकूण ३०५० प्रस्तावांना (२९७८ मृत्यू व ७२ अपंगत्व) शासन निर्णयान्वये रु. ६०.३५ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
तसेच सन २०२५-२६ या वर्षातील १४०३ प्रस्तावांसाठी (१३७६ मृत्यू व २७ अपंगत्व) रु. २७.८४ कोटी इतका निधी यापूर्वी वितरीत करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या एकूण रु. १२० कोटींच्या तरतुदीपैकी रु. ८८.१९ कोटी निधी वितरीत झाला असून, योजनेच्या लेखाशीर्षाखाली रु. ३१.८१ कोटी निधी शिल्लक आहे.
दरम्यान, आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सन २०२५-२६ या वर्षातील दि. २२ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त होऊन तालुकास्तरीय समितीच्या शिफारशीने मंजूर झालेल्या एकूण १६२३ प्रस्तावांसाठी (१५८८ मृत्यू व ३४ अपंगत्व) रु. ३२.१४ कोटी निधीची मागणी शासनाकडे केली होती.
मात्र, योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या शिल्लक निधीचा विचार करता, शासनाने रु. ३१.८१ कोटी इतका निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील तालुकास्तरीय समितीने मंजूर केलेले दावे निकाली काढण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
सदर निधी आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करण्यात येणार असून, निधीचा विनियोग शासन निर्णयातील तरतुदीनुसार करणे व त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

