✍️ लोकवाणी आवाज
📝 ८ डिसेंबर २०२५
गडचिरोली : एखादं गाव म्हणलं की अनेक घरे, चौक, ग्रामपंचायत, मुलांची शाळा, देवस्थान अशी अनेक चित्रं आपल्या डोळ्यासमोर येतात. पण धानोरा तालुक्यातील इरपुंडी या एका गावाची कहाणी मात्र यापेक्षा पूर्ण वेगळी आहे. कारण या संपूर्ण गावात सात लोकांचा एकच परिवार राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
इरपुंडीमध्ये झाडे कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून राहत आहे. गावात यांच्याशिवाय इतर कोणीही राहत नाही. आजूबाजूला घनदाट जंगल आणि शांत वातावरण अशा परिस्थितीत हे कुटुंब 44-45 वर्षांपासून एकटेच आपले दैनंदिन जीवन जगत आहे.
गाव गडचिरोली शहरापासून सुमारे 42 किमी, तर जिल्हा मुख्यालयापासून साधारण 50 किमी अंतरावर आहे.
सर्वात जवळची गावे तुकुम आणि इतर छोटी वस्ती काही किलोमीटरवर आहेत.
2011 च्या जनगणनेत या गावाची स्वतंत्र नोंद करण्यात आली असून ते महसुली गाव म्हणून ओळखले जाते. लोकसंख्येने अत्यंत लहान असले तरी गावाची प्रशासकीय ओळख अद्यापही टिकून आहे.
अतिदुर्गम परिसर, जंगल आणि डोंगराळ रस्ता असूनदेखील येथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध आहे. शासनाने या गावाकडे जाण्यासाठी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून दिले आहे. गावात फक्त एक कुटुंब असतानाही सुविधा पोहोचवल्या गेल्यामुळे हा भाग चर्चेत आला आहे.
गाव जंगलाच्या आत असल्यामुळे वाघांसह इतर वन्यप्राण्यांचा धोका झाडे कुटुंब सतत अनुभवत असते. पण त्यांच्यानुसार,
"आमच्या पूर्वजांची जमीन इथेच आहे. दुसरीकडे गेलो तर राहायला जागा कुठून मिळणार? म्हणूनच इथेच राहतो,"
असं कुटुंब सांगतं.
भीती असूनही या जागेशी त्यांचे भावनिक नाते असल्याने त्यांनी गाव सोडण्याचा विचार कधीच केला नाही.
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या गावांपैकी एक म्हणून इरपुंडीचं नाव प्रसिद्ध होत आहे.
जंगलाच्या मध्यभागी दशकानुदशके आपली परंपरा जपणारे सात सदस्य आजही गावाची ओळख टिकवून आहेत.

