✍️ लोकवाणी आवाज
📝 ७ डिसेंबर २०२५
गडचिरोलीच्या संवेदनशील भागांत गेल्या काही काळात मोबाईल टॉवरमधील बॅटऱ्या चोरी होण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. या वारंवार होत असलेल्या चोरीमुळे टॉवर कंपन्यांना तसेच पोलिसांना अडचणी निर्माण होत होत्या. याबाबत तक्रारी वाढताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला स्वतंत्र तपासासाठी विशेष सूचना दिल्या.
एलसीबीच्या पथकाने सलग १५ दिवस विविध टॉवर परिसरांवर पाळत ठेवली. या दरम्यान रात्रीच्या वेळी फिरणारे एक संशयास्पद पिकअप वाहन पोलिसांना आढळले. त्यावर कार्यवाही करत गोविंद खंडेलवार (१९, रा. आलापल्ली) याला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पडताळणी केली असता ते चोरीचे असल्याचे उघड झाले. चौकशीत खंडेलवारने स्वतः, उमेश मनोहर इंगोले (३८, रा. नेहरूनगर, गडचिरोली) तसेच इतर दोन साथीदार यांच्या मदतीने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली.
या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून चोरलेला माल ते अहेरी येथील तिरुपती व्यंकया दासरी (३८) याला विकत असल्याचे समोर आले. दासरी पुढे या बॅटऱ्या कागजनगरमधील एका व्यक्तीकडे विकत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
उघडकीस आलेले गुन्हे
या तपासामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेली मोबाईल टॉवर बॅटरी चोरीची एकूण ८ प्रकरणे उलगडली—
अहेरी – २ गुन्हे
पेरमिली – २ गुन्हे
पोमकें येमली बुर्गी – २ गुन्हे
ताडगाव – १ गुन्हा
राजाराम (खां) – १ गुन्हा
तसेच गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) येथील एक वाहन चोरीचा गुन्हाही या टोळीशी संबंधित असल्याचे पुढे स्पष्ट झाले
या कारवाईत पोलिसांनी —
२ लाख रुपये रोख,
३ लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन,
आणि इतर साहित्य
असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
आरोपी सध्या पोमकें येमली बुर्गी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असून, उर्वरित प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
ही कारवाई —
पोलीस अधीक्षक नीलोत्पल,
अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश,
अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा,
अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी.
यांच्या मार्गदर्शनाखाली,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्यात आली.

