✍️ लोकवाणी आवाज
📝 ०२ डिसेंबर २०२५
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथे आज दुपारी वाघाच्या हल्ल्यात कुंदा खुशाल मेश्राम (वय 65) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास नातवाने त्यांना शेतीच्या कामासाठी शेतात नेऊन सोडले होते. नेहमीप्रमाणे त्या शेतात काम करत होत्या. दुपारी अंदाजे तीन वाजता नातू त्यांना आणण्यासाठी गेला असता त्या शेतात दिसल्या नाहीत.
शोध घेत असताना जवळच रक्ताचे डाग पसरलेले दिसल्याने कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्या दिशेने शोध सुरू केला. त्या आधाराने पाहणी केली असता तलावाच्या पाळीवर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मानेला गंभीर जखम असून काही भाग खाल्लेला दिसून आल्याने हा वाघाचा हल्ला असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे इंजेवारी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने माहिती मिळताच गावात पाहणी सुरू केली असून पुढील आवश्यक प्रक्रिया सुरू आहे.

