✍️ लोकशाही आवाज
📝 ५ डिसेंबर २०२४
मुंबई:- डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी नोव्हेंबर महिन्याचा लाडकी बहिण हप्ता अजूनही अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये हप्ता नेमका कधी मिळणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे हप्त्याच्या वितरणात विलंब झाल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून महिलांना एकाचवेळी दोन हप्ते देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अनधिकृत सूत्रांनुसार, येत्या काही दिवसांतच नोव्हेंबर आणि डिसेंबर — हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे जमा होऊ शकतात.
असे झाल्यास लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण ३,००० रुपये जमा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही आले होते दोन हप्ते
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात महिलांच्या खात्यात एकदाच दोन महिन्यांचा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यावेळीही महिलांना एकरकमी ३,००० रुपयांची रक्कम मिळाली होती. त्यामुळे यंदाही अशीच प्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र प्रशासनातील काही सूत्रांकडून पुढील आठवड्यात रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर हप्ता वितरण गतीने सुरू होईल अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.
नोव्हेंबर महिन्याचा हप्ता उशिरा मिळत असल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र डिसेंबरमध्ये दोन हप्ते मिळण्याची शक्यता समोर आल्यानंतर आता सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष पुन्हा बँक खात्याकडे लागले आहे.

