लाडक्या बहिणींना संक्रांतीला 3000 रुपये नाहीत; निवडणूक आयोगामुळे हप्ता फक्त 1500
✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 १३ जानेवारी २०२६
![]() |
| लाडकी बहीण योजना : महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना दरमहा आर्थिक आधार देणारी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सध्या राज्यभरात दीड कोटीहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.
मात्र डिसेंबर 2025 महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामागचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुका. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने सरकारी योजनांबाबत काही निर्बंध आले आहेत.
दरम्यान, मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जातील, अशी चर्चा जोरात होती. यापूर्वी दिवाळी व भाऊबीज सणांच्या वेळी दोन महिन्यांचा लाभ एकत्र देण्यात आला असल्याने यंदाही तसे होईल, अशी अपेक्षा लाभार्थींमध्ये निर्माण झाली होती. याबाबत काही माध्यमांत बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.
मात्र या घोषणांवर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असताना, त्याआधी 14 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ दिल्यास मतदारांवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद काँग्रेसने केला. या माध्यमातून कोट्यवधी महिला मतदार प्रभावित होऊ शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रकरणाची दखल घेत मुख्य सचिवांकडून स्पष्टीकरण मागवले. आयोगाने स्पष्ट निर्देश देत लाडकी बहीण योजनेचा अग्रिम स्वरूपात लाभ देण्यास मनाई केली आहे. म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता आचारसंहितेच्या काळात देण्यात येणार नाही.
तथापि, आयोगाने एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू असलेल्या योजनांचा नियमित किंवा प्रलंबित हप्ता देण्यास परवानगी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत, मात्र दोन महिन्यांचे एकत्र 3000 रुपये देण्यास नकार देण्यात आला आहे.
तसेच आचारसंहितेच्या काळात नवीन लाभार्थी जोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत, मकरसंक्रांतीला लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार नसल्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र डिसेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता लाभार्थींना मिळणार असल्याने महिलांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

