सिन्नरमध्ये शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला; विहिरीत पडून शेतमजूर व बिबट्याचा मृत्यू

Rambhau
0

 ✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज) 

 🌐 ०५ जानेवारी २०२६

सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे विहिरीत पडलेला बिबट्या आणि शेतमजूर; दुर्दैवी घटनेचे प्रतिकात्मक छायाचित्र
सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे शेतात काम करताना बिबट्याच्या हल्ल्यात विहिरीत पडून शेतमजूर व बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना – प्रतिकात्मक छायाचित्र.



शेतात रोजीरोटीसाठी राबणाऱ्या हातांवर अचानक मृत्यू कोसळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात घडली. शिवडे (ता. सिन्नर) येथे रविवारी (दि. ४) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर आणि बिबट्या दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सावता माळीनगर येथील गोरख लक्ष्मण जाधव (वय ४३) हे शिवडे गावातील गणपत चव्हाणके यांच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी काम सुरू असताना ते विहिरीजवळील आंब्याच्या झाडाखाली बसून न्याहारी करत होते. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागून अचानक जाधव यांच्यावर झडप घातली.

जीव वाचवण्यासाठी जाधव यांनी बिबट्याशी झुंज दिली. काही क्षण चाललेल्या झटापटीत दोघेही अवघ्या दहा फुटांवर असलेल्या, कठडे नसलेल्या विहिरीत कोसळले. विहिरीत पाणी अधिक असल्याने जाधव यांचा आरडाओरडा सुरू झाला.

महिला शेतमजूर आणि ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र विहिरीत असलेल्या वीजपंपाच्या फाउंडेशनवर बिबट्या बसल्याने आणि परिस्थिती धोकादायक असल्याने कुणालाही खाली उतरता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यामुळे धोका असल्याने ग्रामस्थांनी संतप्त भूमिका घेतली. अखेर विहिरीत पिंजरा सोडण्यात आला आणि बिबट्याला त्यात अडकवण्यात आले.

पोहणारे गोविंद तुपे यांच्या मदतीने गोरख जाधव यांचा मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दरम्यान, बचावकार्यात पिंजरा वारंवार पाण्यात बुडाल्याने बिबट्याच्या नाकातोंडात पाणी गेले. काही वेळातच त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाने दिली.

या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शवविच्छेदन अहवालात जाधव यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर व पोटावर बिबट्याच्या पंजाच्या खोल जखमा आढळल्या. गोरख जाधव यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. मोलमजुरीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!