राज्यातील विमानतळ विकासाला गती; गडचिरोलीत ग्रीनफिल्ड विमानतळाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Rambhau
0

✍️ लोकवाणी आवाज टिम 

 📅 ०१ फेब्रुवारी २०२६

गडचिरोलीसाठी प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पाचे प्रतिनिधिक छायाचित्र
गडचिरोलीत ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणीला गती देण्याचा निर्णय


गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला थेट गती देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या बैठकीत झाला. खनिजसंपन्न आणि स्टील उद्योगासाठी वेगाने पुढे येत असलेल्या गडचिरोलीत ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याचे स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्ह्यात वाढत असलेली गुंतवणूक, येणारे मोठे प्रकल्प आणि वाढणारी मालवाहतूक पाहता आता गडचिरोलीला थेट हवाई संपर्क देणे गरजेचे असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.


गडचिरोलीसाठी हा निर्णय मोठा मानला जातोय. विमानतळ उभा राहिला तर उद्योगांना सोय होईलच, पण विद्यार्थ्यांना, रुग्णांना, व्यावसायिकांना आणि पर्यटन क्षेत्रालाही फायदा होणार आहे. आजपर्यंत ‘दुर्गम’ म्हणून ओळख असलेल्या भागाला थेट विमानसेवा मिळाली तर जिल्ह्याची ओळखच बदलू शकते, अशी भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.


सविस्तर वाचा: सिरोंचा NH-353C रस्त्यासाठी वनजमीन हस्तांतरणास मंजुरी


गडचिरोलीसह राज्यातील विमानतळांना वेग


विधिमंडळातील समिती कक्षात महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ९३ वी बैठक पार पडली. बैठकीत राज्यातील विविध विमानतळांच्या कामांचा आढावा घेण्यात आला आणि जी कामे सुरू आहेत ती ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.


आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित वाढवण बंदर राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे बैठकीत नमूद झाले. या बंदराला रस्ता, रेल्वे आणि विमानमार्गाने चांगली जोडणी देण्यावर भर देण्यात आला. तसेच वाढवण आणि विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यासाठी जागा निश्चितीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.


बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष स्वाती पांडेय, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय सिंघल तसेच मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन विटणकर उपस्थित होते.


हे सुद्धा वाचा: गडचिरोलीतील LTB बेव्हरेजेस इथेनॉल प्रकल्पाच्या सार्वजनिक सुनावणीला स्थगिती


दरम्यान, मिहान प्रकल्पासाठी ५९७ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी २९७ कोटी रुपये वितरित झाले आहेत. येथे Patanjali Ayurveda चा प्रकल्प सुरू झाला आहे. तसेच Indian Institute of Management Nagpur, कमर्शियल कॉम्प्लेक्स, कार्गो हब, ई-व्ही चार्जिंग स्टेशन, हेल्थकेअर सुविधा आदी प्रकल्प विकसित होत आहेत. ३९ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे आणि शिवणगाव व वित्तुबाबानगर परिसरातील पायाभूत सुविधांसाठी ९९ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


नांदेड, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील कार्यरत विमानतळांच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाचाही आढावा घेण्यात आला. राज्यातील एकूण नऊ विमानतळांच्या विकासकामांना गती देत उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती वाढवण्याचा स्पष्ट रोडमॅप या बैठकीत ठरवण्यात आला. आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांसाठीही हा निर्णय पुढील काही वर्षांत मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.


गडचिरोलीत ग्रीनफिल्ड विमानतळ का उभारला जाणार आहे?
गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेली औद्योगिक गुंतवणूक, स्टील उद्योग आणि वाढती मालवाहतूक लक्षात घेता जिल्ह्याला थेट हवाई संपर्क देण्यासाठी ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विमानतळाचा स्थानिकांना काय फायदा होणार?
विमानतळामुळे उद्योगांना सोय होईलच, पण रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. जिल्ह्याची ओळख आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.
वाढवण बंदराशी या निर्णयाचा संबंध काय आहे?
वाढवण हे आशियातील मोठे प्रस्तावित बंदर असून त्याला रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गाने सक्षम जोडणी देण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. त्याच धोरणाचा भाग म्हणून नवीन विमानतळांची उभारणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!