✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०२ फेब्रुवारी २०२६
![]() |
| अवैध दारूविक्री संदर्भातील प्रतिनिधिक छायाचित्र |
गडचिरोली जिल्ह्यात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून देशी व विदेशी दारूसह १२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, खरपुंडी येथील अजय चिचघरे हा चारचाकी वाहनातून किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नवरगाव परिसरात सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान वाहनातून विविध कंपन्यांच्या बिअर व दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या. तसेच अंदाजे ८ लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचे वाहनही ताब्यात घेण्यात आले. एकूण सुमारे १२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
संबंधित बातमी वाचा: गडचिरोली C60 जवान दीपक मडावी शहीद; शासनाची मदत जाहीर – सविस्तर वाचा
या प्रकरणी अजय चिचघरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन फरार संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोटेगाव येथील पोलिस उपनिरीक्षक सीमा किंकर करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक Neelotpal यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
रंगपंचमीआधी कुरखेड्यातही नाकेबंदी
दरम्यान, मध्यरात्री कुरखेडा पोलिसांनी नान्ही–तळेगाव मार्गावर नाकेबंदी केली असता स्कूटीवरून देशी दारूची वाहतूक करणारा एक व्यक्ती पकडण्यात आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडून देशी दारूच्या चार पेट्या जप्त करण्यात आल्या. या दारूची बाजारमूल्य सुमारे २८ हजार रुपये असून २५ हजार रुपये किमतीची स्कूटीसह एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
हेही वाचा: गडचिरोलीत मोबाईल टॉवर बॅटरी चोरी प्रकरणात मोठी कारवाई – अधिक माहिती येथे
या प्रकरणी आकाश तुळशीराम कोरेटी (वय २८, रा. नान्ही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरखेडा पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. सणासुदीच्या काळात अवैध दारूविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

