✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०२ मार्च २०२६
![]() |
| पोर्ला येथील Bank of Maharashtra शाखेचे मुख्य प्रवेशद्वार आणि फलक |
पोर्ला येथील Bank of Maharashtra शाखेत अखेर बदल झाला आहे. सोमवार, 2 मार्च 2026 रोजी शाखा व्यवस्थापक कुळमेथे मॅडम आणि उपशाखा व्यवस्थापक यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी श्रेया लिमये या शाखा व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्या असून उपशाखा व्यवस्थापक म्हणून स्वाती दुधे यांनी पदभार स्वीकारला आहे.
महत्त्वाचे म्हणजे शांताबाई मानकर यांचा प्रकार घडण्याच्या आधीच त्यांच्या कामकाजाबाबत नागरिक नाराज होते. ग्राहकांशी वागणूक, पिक कर्जातील अडचणी, माहिती देताना टाळाटाळ अशा अनेक मुद्द्यांवर लोकांनी आक्षेप घेतला होता.
हे प्रकरण होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी, तहसीलदार, अग्रणी बँक तसेच मुख्यमंत्री सचिवालयाकडे बदलीसाठी अर्ज देण्यात आले होते. त्यानंतर ग्रामसभेतही बदलीचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
संबंधित बातमी: पोर्ला Bank of Maharashtra शाखेविरोधात ग्राहक तक्रारी व ग्रामसभा ठराव
दरम्यान, 25 तारखेला काटली येथील शांताबाई मानकर या कोमात असताना त्यांना पैशांसाठी पोर्ला शाखेत आणावे लागल्याचा प्रकार घडला. एवढ्या गंभीर अवस्थेतही बँकेकडून गाडीपाशी जाऊन विचारपूस झाली नाही, असा आरोप करण्यात आला होता. 28 तारखेला त्यांचे निधन झाले आणि त्यामुळे आधीपासून नाराज असलेल्या लोकांमध्ये संताप आणखी वाढला.
अर्ज, ग्रामसभा आणि पाठपुराव्यानंतर बदली; तरीही कारवाईची मागणी कायम
जिल्हा प्रशासनाकडे दिलेले अर्ज, ग्रामसभा ठराव आणि स्थानिक मीडिया व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाली. मात्र गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, केवळ बदली करून विषय संपत नाही.
संबंधित अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की, ज्या शाखेत त्या पुढे जातील तिथेही त्यांचा व्यवहार पूर्वीप्रमाणेच राहिला तर पुन्हा तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे वरिष्ठांनी योग्य कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.
याच दरम्यान, आठ दिवसांपूर्वी वसा येथील एका खातेदाराच्या खात्यातून बनावट सही करून पैसे काढल्याचा प्रकारही समोर आला होता. तक्रार केल्यानंतर पैसे परत करण्यात आले, मात्र त्यामुळे शाखेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
हेही वाचा: गडचिरोलीतील अडपल्ली गावाचा मेटा स्टील प्रकल्पाला तीव्र विरोध
आता नवीन शाखा व्यवस्थापक आणि उपशाखा व्यवस्थापकांकडून साधं, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख कामकाज होईल, अशी पोर्ला व परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. “आता तरी बँकेत गेल्यावर माणुसकीची वागणूक मिळावी,” अशी सरळ भावना लोक व्यक्त करत आहेत. पुढील काळात कामकाजात नेमका काय बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

