✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २७ मार्च २०२६
![]() |
| प्रतीकात्मक चित्र : अपघातग्रस्तांना आता १.५० लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध |
राज्यात रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. आता अपघातानंतर उपचारासाठी पैशांची अडचण येणार नाही. “पीएम-राहत” योजनेअंतर्गत जखमींना थेट १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. अपघातानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असल्याने या काळात तातडीने उपचार मिळणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यास मृत्यूदर कमी करण्यास मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले.
या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त ७ दिवसांपर्यंत १.५० लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. त्यामुळे अपघातानंतर आर्थिक कारणांमुळे उपचारात होणारा विलंब टाळता येणार आहे.
अपघात झाल्यास तात्काळ काय करावे? जाणून घ्या
अपघात झाल्यानंतर २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल केल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो. सुरुवातीला जवळच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार सुरू करता येतात. तेथे रुग्णाची प्रकृती स्थिर केल्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी मान्यताप्राप्त रुग्णालयात हलविण्यात येते.
या योजनेत “आयुष्यमान भारत” तसेच “महात्मा फुले जनआरोग्य योजना” अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्येही प्राथमिक उपचार देणे बंधनकारक आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याने अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

