✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १६ जून २०२६
![]() |
| प्रतिकात्मक छायाचित्र : लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीची फसवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी आरोपी अटकेत |
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे एका डॉक्टरविरुद्ध दाखल झालेल्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन एका तरुणीचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप संबंधित डॉक्टरवर करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव डॉ. बिजन प्रधान सरकार असे असल्याचे समोर आले आहे. आष्टी येथे तो 'नमिता हॉस्पिटल' नावाचे क्लिनिक चालवित असल्याची माहिती आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, ओळख झाल्यानंतर डॉक्टरने तिच्याशी जवळीक वाढवली आणि लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.
मौजा पोर्ला येथे अवैद्य देशी-विदेशी दारू व पावडर मिश्रित ताडीची जोमात विक्री; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष?
👉 पूर्ण माहिती वाचा
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, लग्नाच्या विश्वासावर आरोपीने वेळोवेळी तिच्याशी संबंध ठेवले. मात्र नंतर लग्नाबाबत विचारणा केल्यावर डॉक्टरने नकार दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल, आरोपीला अटक
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. बिजन प्रधान सरकार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.
अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
गडचिरोलीत बनावट नोटांचे रॅकेट उघड; अभियंता भावंडांसह चौघांना अटक
👉 संपूर्ण बातमी वाचा
दरम्यान, आष्टी आणि गडचिरोली परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीवर असे गंभीर आरोप झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

