पोर्ला परिसर व वैनगंगा नदीकिनारी वाघ व बिबट्यांचा वावर; वनविभाग व लोकवाणी तर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 १७ जानेवारी २०२६
पोर्ला परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे जाहीर आव्हान वडसा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र कार्यालय, पोर्ला तर्फे करण्यात आले आहे. पोर्ला, वसा व वसा चक या गावांच्या लगत असलेल्या जंगल परिसरात तसेच पोर्ला ते देलोडा रोड आणि पोर्ला ते नवरगांव रोड परिसरात वाघ व बिबट्यांचा वावर आढळून आल्याची माहिती वनविभागाने प्रसारीत केली आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत जंगल परिसरात जाणे धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी विनाकारण जंगलात प्रवेश करू नये, अन्यथा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी एकटे जाणे टाळावे. शक्यतो तीन ते चार लोकांच्या समुहाने, मोबाईल किंवा इतर साधनांच्या सहाय्याने आवाज करत शेतात जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरे चारणाऱ्या गुराख्यांनी जंगलाच्या आत गुरे नेऊ नयेत. गावाच्या आसपासच्या मोकळ्या जागेतच गुरे चराई करावी, जेणेकरून वन्यप्राण्यांशी थेट सामना होण्याचा धोका टाळता येईल, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, पोर्ला ते देलोडा व पोर्ला ते नवरगांव या मार्गांवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी वाहनांचा वेग कमी ठेवावा व विशेषतः सकाळी लवकर आणि रात्रीच्या वेळी अधिक सावधगिरी बाळगावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, लोकवाणी आवाज तर्फे नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती जोडण्यात येत आहे. पोर्ला परिसरामध्ये वैनगंगा नदीच्या किनारी धावरीबरड आणि आसपासच्या परिसरातही कधी कधी वाघाचा वावर आढळून येतो. त्यामुळे वैनगंगा नदी परिसरातील नागरिक, शेतकरी, मासेमारी करणारे व नदीकाठाने ये-जा करणाऱ्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे लोकवाणी आवाज तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच कोणत्याही ठिकाणी वाघ किंवा बिबट्या आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ वनविभागास माहिती द्यावी. स्वतःहून कोणतीही धोकादायक कृती करू नये, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.
पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने हे जाहीर आव्हान पापलेटच्या माध्यमातून गावोगावी चिपकवण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

