नशामुक्ती, शाकाहार व ब्रह्मचर्याचा संदेश देणारा डेरा सच्चा सौदा सत्संग
✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 १७ जानेवारी २०२६
आज दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी पोर्ला येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, पोर्ला येथे डेरा सच्चा सौदा, सिरसा (हरियाणा) परमपूज्य गुरुजी संत डॉक्टर गुरमीत रामरहीम सिंगजी इन्सान यांचा भव्य सत्संग प्रवचन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम सिरसा, हरियाणा येथून थेट लाईव्ह प्रसारणाद्वारे आयोजित करण्यात आला होता.
या सत्संगाचे आयोजन महाराष्ट्रातील सेवाधारांसोबतच हरियाणा राज्यातील कार्यकर्त्यांनीही संयुक्तपणे केले होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हरियाणामधील सेवाभावी कार्यकर्ते प्रत्यक्ष पोर्ला येथे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांतता, शिस्त व आध्यात्मिक वातावरणात पार पडला.
सत्संग प्रवचनात गुरुजींनी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तीन महत्त्वाची गुरुवचने सांगितली.
पहिल्या गुरुवचनामध्ये नशामुक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नशेमुळे केवळ आरोग्यच नव्हे तर कुटुंब, समाज व भविष्य यांचेही नुकसान होते. नशामुक्त जीवन स्वीकारल्यास व्यक्ती सकारात्मक विचारांकडे वळते आणि यशस्वी जीवन जगू शकते, असे गुरुजींनी सांगितले.
दुसऱ्या गुरुवचनामध्ये अंडे व मांस सेवन टाळण्याचा संदेश देण्यात आला. शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत राहते आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारता येतो, असे स्पष्ट करण्यात आले.
तिसऱ्या गुरुवचनामध्ये ब्रह्मचर्य पालनाचे फायदे समजावून सांगण्यात आले. ब्रह्मचर्यामुळे आत्मबल वाढते, मनावर नियंत्रण मिळते आणि जीवनात स्थैर्य व प्रगती साधता येते, असे गुरुजींनी सांगितले.
डेरा सच्चा सौदा संस्थेमार्फत १९९० पासून आजपर्यंत १७० पेक्षा अधिक मानवता भल्याची कार्ये सातत्याने राबवली जात आहेत. संस्थेचे पहिले गुरू शहा मस्तान जी महाराज (१९४८–१९६०), दुसरे गुरू शहा सतनाम सिंगजी महाराज (१९६०–१९९०) आणि सध्याचे तिसरे गुरू संत डॉक्टर गुरमीत रामरहीम सिंगजी इन्सान हे मानवकल्याणाचे कार्य पुढे नेत आहेत.
या कार्यक्रमासाठी सुरजित इन्सान, गोपीचंद इन्सान, शारदा इन्सान, गजानन इन्सान, गणेश इन्सान, बहिण मंगला इन्सान (महाराष्ट्र) तसेच रामप्रसाद इन्सान व हरियाणामधील इतर सेवाधार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सत्संगाला पोर्ला गावासह परिसरातील महिला, पुरुष, मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी गुरुजींच्या संदेशाचे मनापासून स्वागत केले व सामाजिक परिवर्तनाचा संकल्प केला.

