✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ५ एप्रिल २०२६
![]() |
| पोरला गावात गॅस वितरणावेळी मोठी गर्दी; कमी सिलेंडरमुळे नागरिकांमध्ये नाराजी |
पंकज येवले जिल्हा प्रतिनिधी:- पोरला गावात गॅस सिलेंडरच्या टंचाईने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. रोजच्या गरजेचा गॅस मिळत नसल्याने लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे, तरीही सर्वांना सिलेंडर मिळेल याची खात्री नाही.
आज पोरला गावात जवळपास 200 लोक गॅससाठी एकत्र आले होते. मात्र गॅस एजन्सीकडे फक्त 100 सिलेंडर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले आणि नागरिकांमध्ये नाराजी पसरली.
फक्त पोरलाच नाही, तर आसपासच्या अनेक गावांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात गॅसची टंचाई जाणवत असून, सामान्य माणसाचे जगणेच कठीण झाले आहे.
टंचाई वाढताच ब्लॅक विक्रीचा संशय
नागरिक सांगतात, “ज्यांचे सिलेंडर संपले आहेत किंवा ज्यांनी आधीच बुकिंग केले आहे, त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. पण इथे कोणतीच नीट व्यवस्था दिसत नाही.”
सरकारकडून घरपोच सिलेंडर मिळतो असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र आहे. यामुळे अफवा आणि संभ्रमही वाढत आहे.
याशिवाय काही नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. “जर एखादा माणूस गावात नसला, तर त्याच्या नावाचा सिलेंडर दुसऱ्यालाच दिला जातो,” असा आरोप करण्यात आला. त्यामुळे ब्लॅकमध्ये सिलेंडर विक्री होत असल्याचा संशय अधिकच बळावला आहे.
एकूणच, पोरला गावासह ग्रामीण भागात गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

